जळगाव समाचार | ५ नोव्हेंबर २०२६
जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर महिन्यात धडक कारवाई केली. जिल्हाभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल २२२ गुन्हे दाखल करून १८७ संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत आठ वाहने, अवैध मद्यसाठा आणि अन्य साहित्य असा एकूण ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्या, बेकायदेशीर मद्यविक्रीची ठिकाणे आणि दारू तस्करीच्या मार्गांवर पथकांनी अचानक छापे टाकले. यामध्ये ३ हजार ८५६ लिटर हातभट्टी दारू, २८४ लिटर देशी दारू, २३८ लिटर ताडी, १८ लिटर विदेशी मद्य आणि ४९ लिटर बिअर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी विविध ठिकाणी साठवून ठेवलेले तब्बल ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन (वॉश) पथकांनी शोधून काढले. हे रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. अवैध दारूची वाहतूक आणि विक्रीसाठी वापरली जाणारी आठ वाहनेही जप्त करण्यात आली.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांना इशारा
ऑक्टोबर महिन्यातील या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा आणि निर्मितीसाठी लागणारे कच्चे रसायन आढळून आल्याने जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाचे स्वरूप पुन्हा समोर आले आहे. केवळ दारूसाठा जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता निर्मितीची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यावरही विभागाने भर दिला. अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि तस्करीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला.

![]()







