गुजरातमधून ट्रॅव्हल्सद्वारे आलेल्या ६४ हजार ८०० रुपयांच्या मालावर कारवाई; व्यापारी आणि पुरवठादार पसार, भेसळीच्या साखळीचा शोध घेण्याचे आव्हान
जळगाव समाचार | ६ नोव्हेंबर २०२६
दिवाळीच्या सणात मिठाईची मागणी वाढलेली असतानाच जळगावात संशयास्पद खव्याचा मोठा साठा उघडकीस आला आहे. गुजरातमधून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात आणण्यात आलेल्या तब्बल २४० किलो संशयास्पद खव्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून जप्तीची कारवाई केली. जप्त मालाची किंमत ६४ हजार ८०० रुपये असून, त्याच्या माध्यमातून मिठाई तयार केली जाणार होती का, याबाबत संशय व्यक्त होत आहे. मात्र, या कारवाईनंतर खवा नेमका कोणाचा होता, जळगावात कोणाला पुरवला जाणार होता आणि या व्यवहारामागे कोणती व्यावसायिक साखळी आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने आकाशवाणी चौक परिसरात सापळा रचला होता. गुजरातमधून ‘प्रीमियम क्वालिटी डेलिशियस स्वीट’ या नावाने खवा आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने लक्ष ठेवले होते. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्सने अचानक मार्ग बदलत नेरी नाक्याजवळील बालाजी ट्रॅव्हल्सच्या बाहेर थांबून खव्याच्या आठ गोण्या उतरवल्या आणि लगेच तेथून रवाना झाली. संशय आल्याने पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता प्रत्येकी ३० किलो वजनाच्या आठ बॅगा आढळल्या. अशा प्रकारे एकूण २४० किलो माल जप्त करण्यात आला. एका बॅगेची किंमत ८ हजार १०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, हा माल नेरी नाक्यावरील अस्वच्छ ठिकाणी बेवारस अवस्थेत ठेवण्यात आला होता.
या प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे खव्याच्या पाकिटांवरच ‘हा दुग्धजन्य पदार्थ नाही’ असा स्पष्ट उल्लेख आहे. पाकिटांवरील माहितीनुसार त्यामध्ये मिल्क पावडर, वनस्पती फॅट, फूड कलर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे हा पदार्थ नेमका कोणत्या स्वरूपात विक्रीसाठी आणला होता, त्याचा मिठाई तयार करण्यासाठी वापर होणार होता का आणि ग्राहकांना तो कोणत्या नावाने विकला जाणार होता, याचा तपास होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वी या मालाला भेसळयुक्त ठरवता येणार नसले, तरी त्यातील घटक आणि वाहतुकीचा उद्देश यांची सखोल चौकशी गरजेची आहे. कारवाईदरम्यान संबंधित खवा व्यापारी आणि ट्रॅव्हल्स चालक पसार झाल्याने पुरवठादार व स्थानिक खरेदीदारांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
केवळ माल जप्त करून चालणार नाही; पुरवठा साखळी उघड होणार का?
या कारवाईने अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवाळीसारख्या मोठ्या सणात मिठाई, खवा, दूध, तूप आणि पनीरची मागणी वाढत असताना बाजारपेठेत नियमित तपासणी आणि विशेष मोहीम राबवली जाते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नागरिकांकडून किंवा गुप्त माहिती मिळाल्यानंतरच प्रशासन सक्रिय होते का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासनाने केवळ संशयास्पद माल जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता गुजरातमधील पुरवठादार, जळगावातील संभाव्य खरेदीदार, वाहतुकीची कागदपत्रे आणि यापूर्वी झालेल्या अशाच व्यवहारांचा तपास करणे आवश्यक आहे. जप्त मालाचे प्रयोगशाळेतील निष्कर्ष, त्यानंतरची कायदेशीर कारवाई आणि तपासाची सद्यस्थिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडली पाहिजे. कारण अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. २४० किलो खवा जप्त झाला, मात्र त्यामागील संपूर्ण साखळी उघड होणार का, की कारवाई केवळ जप्तीपुरतीच मर्यादित राहणार, हा खरा प्रश्न आहे.

![]()







