एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

fire isolated over black background

 

जळगाव समाचार | ४ ऑगस्ट २०२६

शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीत मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीच्या इमारतीतून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा उसळताना दिसताच नागरिकांनी तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर बचाव व आग विझविण्याचे काम हाती घेतले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळेत नियंत्रणात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

प्राथमिक टप्प्यात दोन ते तीन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता आणि कंपनीतील ज्वलनशील साहित्याचे प्रमाण लक्षात घेता आणखी अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अखेर सहा ते सात अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी सलग शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेत परिसर सुरक्षित ठेवला.

प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून यंत्रसामग्री, कच्चा माल तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अचूक आकडा निश्चित करण्यासाठी संबंधित विभागाकडून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या बचावकार्यात वाहनचालक युसूफ पटेल, मयूर ओतारी आणि शोएब तडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, इक्बाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी धाडसाने आणि तत्परतेने आग विझविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग इतर औद्योगिक आस्थापनांमध्ये पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून आग लागण्याचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीबाबत पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here