जळगाव समाचार | ३ जानेवारी २०२५
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असताना आणि निकाल जाहीर होण्यास १३ दिवस बाकी असतानाच राज्यभरात एकूण ६७ उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले आहे. मात्र, या बिनविरोध निवडींविषयी गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील सर्व बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष अथवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची सखोल तपासणी केली जाणार असून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बिनविरोध निवडीची अधिकृत विजय घोषणा केली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या चौकशीच्या कक्षेत जळगाव महानगरपालिकेतील १२ बिनविरोध नगरसेवकांचाही समावेश असल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाचे १४ व शिवसेना (शिंदे गट) चे ६ उमेदवार, पिंपरी-चिंचवड व जळगाव येथे भाजपाचे ६ व शिवसेनेचे ६ उमेदवार, तर छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. याशिवाय, मुंबईतील कुलाबा येथील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन स्वीकारले नसल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचीही चौकशी केली जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात बिनविरोध निवडणुकांच्या बाबतीत भाजपाने आघाडी घेतली असून आतापर्यंत भाजपाचे तब्बल ४५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याखालोखाल शिवसेना (शिंदे गट) असून त्यांच्या १९ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपाचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार आणि मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

![]()




