जळगाव समाचार | ९ फेब्रुवारी २०२६
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने माहिती दुरुस्तीकरिता पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले आहेत. ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली आहे किंवा ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी जवळच्या अधिकृत सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महिला व बालविकास विभागाचे श्री. तडवी तसेच संबंधित सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पात्र असूनही कोणतीही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही, याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. आवश्यक ती यंत्रणा राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी व प्रत्येक प्रकरणाचा संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. शासन व प्रशासन सर्व पात्र महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसेच ई-केवायसी प्रक्रिया राबवणारे सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र व संबंधित कर्मचाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नम्र पण ठाम आवाहन केले आहे. “ई-केवायसी करताना पात्र व अपात्र पर्याय निवडताना अत्यंत काळजी घ्यावी. लाडक्या बहिणींची कोणतीही चूक होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घ्यावी. हे काम माता-भगिनींचे आशीर्वाद घेण्याच्या भावनेने करावे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच आपल्या कार्याचे खरे यश आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

![]()




