जळगाव समाचार | २६ एप्रिल २०२६
जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी सायंकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर रंगणार असून अमळनेर सुहांस जायंटस आणि जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी अटीतटीची लढत होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेल्या दोन्ही संघांमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विजेतेपदाची ट्रॉफी कोणाच्या नावावर जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, क्वालिफायर-२ सामन्यात छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत नाणेफेक पार पडली. जामनेर सातपुडा हिरोजचे कर्णधार शतायु कुलकर्णी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रद्युम्न महाजन यांच्या संयमी आणि नाबाद ६१ धावांच्या खेळीला राम राठोड (४३ धावा, २८ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार) व क्रिषी नथानी (३३ धावा) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे जामनेर सातपुडा हिरोजने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६० धावांचा स्पर्धात्मक डाव उभारला. गोलंदाजीत सागर भावसार (४ षटके, ३१ धावा, २ बळी) आणि मनिष चौहान (४ षटके, २५ धावा, २ बळी) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग्जची सुरुवात डळमळीत झाली. अवघ्या १२ धावांत सलामीची फळी कोसळली असताना ओम भोसले यांनी १७ चेंडूत ३२ धावांची आक्रमक खेळी करत संघाला सावरले. त्यानंतर कर्णधार जगदीश झोपे यांनी २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची झंझावाती खेळी साकारत संघाला अवघ्या १७ व्या षटकात ५ गडी राखून विजय मिळवून दिला. या दमदार कामगिरीसाठी जगदीश झोपे यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच निखेलेश चौधरी यांना अचूक गोलंदाजीसाठी, तर जगदीश झोपे यांना सर्वाधिक षटकारांसाठी विशेष सन्मान देण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला जैन इरिगेशनचे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ सहकारी व्ही. एम. भट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

![]()



