जळगाव समाचार | २५ एप्रिल २०२६
आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलच्या आहारी जात असताना त्यांना मानवी मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर अजिंठा फिल्म सोसायटी, जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गंमत जंमत’ या तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शहरातील भाऊंचे उद्यान येथे करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक भान विकसित होऊन कलेविषयीची आवड वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
दि. २४, २५ आणि २६ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित या महोत्सवाचा उद्देश पाल्यांसह पालकांनाही त्यांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देणे हा आहे. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले, तर आयोजक जयेंद्र लेकुरवाळे आणि विनोद ढगे यांच्या हस्ते महापौर दीपमाला काळे यांचा सत्कार करण्यात आला. पुढील काळात अशा सांस्कृतिक उपक्रमांना महानगरपालिकेकडून सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले असून आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले.
कार्यक्रमास अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, पालकशाळेचे रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ तसेच बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार विजेती ‘शाळा सुटली’ तसेच ‘बेबीज डे आउट’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून जास्तीत जास्त मुलांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

![]()



