जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल; करिश्मा नायर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी


जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२६

जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण प्रशासकीय फेरबदल करत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश मंत्रालयाकडून उशिरा रात्री जारी करण्यात आले. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मीनल करणवाल यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती देणारे अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यपद्धतीत प्रशासकीय शिस्त, तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि लोकाभिमुख धोरणांचा ठसा उमटला होता. शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. त्यांच्या बदलीनंतरही त्यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वेग कायम राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

दरम्यान, २०२१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी करिश्मा नायर या तरुण, ऊर्जावान आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. २७ नोव्हेंबर १९९७ रोजी जन्मलेल्या नायर यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी प्राप्त केली असून त्यांनी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कामाचा अनुभव घेतला आहे. २ एप्रिल २०२५ पासून त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. आता जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रभावी कामगिरी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here