विवाहानंतर सहाव्याच दिवशी माहेरी जाताना नववधूचा अपघाती मृत्यूने जिल्हा हळहळला…

 

जळगाव समाचार | १४ जुलै २०२६

विवाहाला अवघे सहा दिवस झाले असताना माहेरी जात असलेल्या २१ वर्षीय नववधू वैशाली पाटील हिचा सोमवारी दुपारी जळगाव शहरालगत विद्यापीठासमोरील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत दुचाकीवर असलेले काका प्रवीण सूर्याजी पाटील (वय ४०, रा. कोळपिंप्री, ता. पारोळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वैशाली पाटील हिचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर धार्मिक परंपरेनुसार देवदर्शन करून नवदांपत्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. सोमवारी वैशालीला प्रथमच माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका प्रवीण पाटील जळगाव येथे आले होते. कुटुंबीयांसोबत भेटीगाठी व जेवण आटोपल्यानंतर दुपारच्या सुमारास दोघे दुचाकीने कोळपिंप्रीकडे रवाना झाले. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाण्याचा आनंद असतानाच नियतीने तिच्यावर घाला घातला.

दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनेची माहिती समजताच वैशालीच्या माहेर व सासरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा व चालकाचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींची माहिती नोंदविण्यात येत असून संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव शहरासह कोळपिंप्री परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here