जळगावातील तरुणांचे पाकिस्तान व लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्क; एटीएसकडून चौकशी

 

जळगाव समाचार | १४ जुलै २०२६

 

राज्यभर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एकाच वेळी राबविलेल्या धडक कारवाईत जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि भुसावळ तालुक्यातील आठ संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या चौकशीत संबंधित तरुणांचा पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी तसेच राजस्थानातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगशी दूरध्वनीद्वारे संपर्क असल्याचे समोर आल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला आहे. विशेषतः संबंधित संशयितांच्या बँक खात्यांमध्ये या गँगकडून किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोणतेही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याची पडताळणी एटीएसकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यभरातील १७५ ठिकाणी एकाचवेळी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान नाशिक आणि जळगाव येथील एटीएस पथक तसेच जिल्हा अँटी टेररिस्ट ब्रँच (एटीबी) यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबविली. ताब्यात घेतलेल्या आठही संशयितांची भुसावळ येथे सलग दोन दिवस सखोल चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असले, तरी तपास सुरू असून आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

तपासादरम्यान ताब्यातील आठ संशयितांपैकी सात जण पाकिस्तानातील शहजाद भट्टी गँगच्या संपर्कात असल्याचे, तर एक जण लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही गँगमधील सदस्यांशी दूरध्वनीद्वारे झालेल्या संपर्काचे स्वरूप, संभाषणातील विषय, संपर्काची वारंवारता आणि त्यामागील संभाव्य उद्देश याबाबत तपास अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. याचबरोबर संबंधित मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे, सोशल मीडियावरील हालचाली आणि आर्थिक देवाणघेवाणीचीही तपासणी सुरू करण्यात आली असून, गेल्या काही महिन्यांत संशयितांच्या खात्यांमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याची कसून छाननी केली जात आहे.

या कारवाईमागे गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या गुप्त माहिती संकलनाची पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि विशेष तपास पथक (एसआयटी) यांनी संबंधित संशयितांच्या हालचाली व संपर्कांवर सातत्याने लक्ष ठेवले होते. शहजाद भट्टी गँगकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे टप्प्याटप्प्याने ब्रेनवॉश करून त्यांना आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून देशविघातक कारवायांकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या तपासातून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here