जळगाव समाचार | ६ मे २०२६
शहरातील बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकाला भुलथापा देत अंगठी व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गजानन विठोबा सर्जेराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे दुपारी सुमारे २.३० वाजता बसस्थानक परिसरात असताना एका अनोळखी इसमाने शेगावला जाणाऱ्या बसबाबत संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच्या साथीदाराने हातचलाखीचा वापर करून खड्याचे रुद्राक्षात रूपांतर केल्याचा आभास निर्माण केला आणि दोघांनी मिळून फिर्यादीला बाजूला नेले.
यानंतर “शनिदोष दूर करून देतो” अशी भुलथापा देत आरोपींनी सर्जेराव यांच्या हातातील अंगठी व रोख रक्कम काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७/२०२६ नोंदविण्यात आला असून भा.न्या.सं. २०२३ कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ हसन मदारी (वय ३२) व मोहसीन जब्बार मदारी (वय ३१) यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या साथीदार सद्दाम मदारी याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल बंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अकरम शेख, नितीन वाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलीस नाईक किशोर पाटील, तसेच पोलीस अंमलदार राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील यांनी पार पाडली असून पाचोरा पोलीस स्टेशनचे दिनेश पाटील, जळगाव रेल्वे संरक्षण दलाचे पंकज बाघ तसेच नेत्रम पथकाचे मुवारक देशमुख, पंकज खडसे व कुंदनसिंग बयास यांनी सहकार्य केले.

![]()




