सरकार झुकणार नाही म्हणाले, पण आम्ही झुकवलं : अभिजित दीपके

 

जळगाव समाचार | २५ जुलै २०२६

 

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी हा आंदोलनाचा मोठा विजय असल्याचा दावा केला. जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना दीपके यांनी, “ते म्हणते होते की, या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आम्ही करून दाखवलं. जर सरकारसमोर झुकला नाही, तर आपण भल्याभल्यांचे राजीनामे घेऊ शकतो,” असे सांगितले. राजीनाम्याची माहिती फोनवर मिळताच त्यांनी आनंद व्यक्त करत गुडघ्यावर बसून आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलन संपलेले नाही. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागण्या अद्याप कायम असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तर इतर कोण आहेत? ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत जनतेचा आवाज दाबता येत नाही,” असेही ते म्हणाले. गेल्या महिनाभरापासून सरकारवर सातत्याने दबाव निर्माण करण्यात आल्याचा दावा करत, “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,” अशा शब्दांत त्यांनी आंदोलनाच्या यशाची भावना व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी सकाळी दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांनी संवादाच्या माध्यमातून समाजाशी वागले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. “सत्तेच्या जोरावर सर्वांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न योग्य नाही. आजची तरुण पिढी प्रश्न विचारते. त्यामुळे आदेश देण्यापेक्षा संवादातून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे,” असे भागवत यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या चार तासांत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने या दोन घडामोडींची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, NEET प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्र सरकारने मोठी प्रशासकीय कारवाई करत राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)तील ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याआधी शिक्षण मंत्रालयातील दोन सचिवांची बदली करण्यात आली होती. परीक्षाप्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी आउटसोर्सिंग व्यवस्थेत बदल, अत्याधुनिक तांत्रिक सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता पूर्णपणे रोखणारी नवीन परीक्षा प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, UPSCच्या ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलच्या माध्यमातून NTAमध्ये चार वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि सोळा तरुण व्यावसायिकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सरकारच्या या सलग निर्णयांमुळे NEET प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासोबतच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here