आषाढी एकादशीनिमित्त अनुभूती बाल निकेतनमध्ये पालखी-दिंडी सोहळा उत्साहात

 

जळगाव समाचार | २५ जुलै २०२६

आषाढी एकादशीनिमित्त अनुभूती बाल निकेतनमध्ये वारकरी परंपरा, भक्ती आणि संस्कारांचा संगम घडविणारा पालखी-दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, बहिणाबाई, जनाबाई आणि मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून दिंडी काढत “जय हरी विठ्ठल”च्या जयघोषात गोल रिंगण केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास ब्राझीलचे पाहुणे मॅथियास चॅव्हेस जेगर यांनी उपस्थिती लावली.

यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठलभक्तीवरील गीतांवर नृत्य सादर केले. “भक्त पुंडलिक” या नाटिकेतून आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारी भाषणे केली, तसेच अभंग गायनाने भक्तिमय वातावरण निर्माण केले.

शिक्षिका वर्षा मोहिते यांनी वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य आणि पायी वारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपात अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी “उभी पंढरी” या गीतावर नृत्य सादर करत सामूहिक “विठ्ठल… विठ्ठल…” गजर केला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता गुळ-शेंगदाण्याच्या लाडूंचा प्रसाद वाटप व अवनी जैन यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here