जळगाव समाचार | २७ सप्टेंबर २०२६
भुसावळ : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ शिवीगाळीवरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, मित्रानेच मित्राचा गळा आवळून व डोके जमिनीवर आपटून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात घडली. गुरुवारी मध्यरात्री रेल्वे स्थानकाच्या पलीकडील अंधाऱ्या भागात हा प्रकार घडला. खून केल्यानंतर संशयिताने थेट वरणगाव पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
राहुल सदाशिव धांडे (वय ३५, रा. भुसावळ) असे मृताचे नाव असून, पवन अनिल सोनावणे (वय ३०, रा. आंबेडकरनगर, वरणगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. राहुल रेल्वे स्थानक परिसरात साफसफाईसह विविध कामे करीत होता. तर पवन यापूर्वी रेल्वे गाड्यांमध्ये चणे-फुटाणे विक्री करीत असल्याचे सांगण्यात येते. दोघांमध्ये जुनी मैत्री होती आणि ते अधूनमधून एकत्र दारू पीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी रात्री दोघे रेल्वे स्थानकाच्या पलीकडील निर्जन परिसरात दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी दारूच्या नशेत राहुलने पवनला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या पवनने रुमालाच्या साहाय्याने राहुलचा गळा आवळला. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आपटल्याने राहुलचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी पवन धावत्या रेल्वेतून खाली पडला होता. त्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात असले, तरी याबाबत अधिकृत पुष्टी पोलिस तपासानंतरच होणार आहे.
घटनेनंतर पवन तेथून निघून गेला; मात्र शुक्रवारी सकाळी तो स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला आणि मित्राचा खून केल्याचे सांगितले. वरणगाव पोलिसांनी याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

![]()






