जळगाव समाचार | २४ सप्टेंबर २०२६
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील परिचित चेहरा आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला व्यावसायिक भागीदार शिवम यांनी दुजोरा दिला.
मुश्ताक खान यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि विविध सहाय्यक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘आशिकी’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘हेरा फेरी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वेलकम’, ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘राऊडी राठोड’, ‘गदर २’ आणि ‘स्त्री २’ यांसह अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. विशेषतः ‘वेलकम’मधील बल्लू या व्यक्तिरेखेने त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. विनोदी तसेच चरित्रप्रधान भूमिकांमध्येही त्यांचा सहज वावर आणि संवादफेक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.
मुश्ताक खान यांच्या आयुष्यातील आणखी एक धक्कादायक प्रसंग २०२४ मध्ये चर्चेत आला होता. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मेरठमधील एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना कारमधून बिजनोरजवळील एका ठिकाणी नेण्यात आले आणि सुमारे १२ तास ओलीस ठेवण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती. अपहरणकर्त्यांनी मोठ्या खंडणीची मागणी केली होती. पहाटे अजानचा आवाज ऐकल्यानंतर जवळ मशिद असावी असा अंदाज घेत त्यांनी तेथून सुटका करून घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचले. या प्रकरणी नंतर पोलिस तपासही झाला.
रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयातून कधी हास्याची फुले उमटवणाऱ्या, तर कधी गंभीर व्यक्तिरेखांना जीवंत करणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. मुश्ताक खान यांच्या निधनाने सहाय्यक आणि विनोदी भूमिकांना स्वतःची वेगळी ओळख देणारा एक गुणी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मोठा चाहतावर्ग आहे.

![]()






