जळगाव समाचार | २८ मे २०२६
प्रख्यात उर्दू कवी, गझलकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे गुरुवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते विविध आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनाची माहिती पत्नी राहत बद्र यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. “बशीर साहेब आम्हाला सोडून गेले,” असा भावनिक संदेश त्यांनी शेअर केल्यानंतर साहित्यविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आधुनिक उर्दू गझलांना नवी ओळख मिळवून देण्यात बशीर बद्र यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. सहज, सोपी आणि थेट मनाला भिडणारी भाषा ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. प्रेम, विरह, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील वास्तव यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या गझला आणि शायरीतून केले. त्यामुळे त्यांना आधुनिक उर्दू गझलांचे महत्त्वाचे शिल्पकार मानले जात होते.
१५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे त्यांचा जन्म झाला. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठात उर्दू विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. पुढे मेरठ महाविद्यालयात उर्दू विभागात व्याख्याता म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सन १९८७ मधील मेरठ दंगली हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी प्रसंग ठरला. दंगलीदरम्यान त्यांचे घर जाळण्यात आले होते. या आगीत त्यांच्या अनेक मौल्यवान कविता आणि साहित्य नष्ट झाले. या घटनेनंतर त्यांनी मेरठ सोडून भोपाळ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१८ मध्ये दुबईस्थित ‘बझ्म-ए-उर्दू’ संस्थेकडून त्यांना प्रतिष्ठेचा ‘जोश-ए-उर्दू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या भोपाळ येथील निवासस्थानी जाऊन देण्यात आला होता.
बशीर बद्र यांच्या निधनामुळे उर्दू साहित्यविश्वाने एक महत्त्वाचा आवाज गमावला आहे.
![]()






