जळगाव समाचार | २८ मे २०२६
धरणगाव तालुक्यातील भवरखेड येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार २७ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला असता सोमनाथ माळी हा खाद्यतेलाचा वापर करून बनावट दूध तयार करत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील वसा वाढविण्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले. कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच खाद्यतेलाचा एक नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असून उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दूध पंच, भवरखेडचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.
दरम्यान, कारवाई सुरू असताना आरोपी सोमनाथ माळी याने लघुशंकेचा बहाणा करून घटनास्थळावरून पलायन केले. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याच्यावर दुधात भेसळ केल्याप्रकरणी संयुक्त कारवाई झाली होती. त्या संदर्भात २९ जुलै २०२५ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला होता.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से., तसेच सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार आणि आकाश बोहाडे यांनी सहभाग घेतला. परिसरात कुठेही अन्न भेसळ अथवा बनावट दूध निर्मितीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
![]()






