शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावावी – सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलू केजो

जळगाव समाचार डेस्क| ६ सप्टेंबर २०२४

“अंधश्रद्धा निर्मूलन हे समाजातील महत्वाचे कार्य आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी महत्वाची भूमिका निभावली पाहिजे. भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलू केजो यांनी केले. त्या जळगाव येथे आयोजित वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

समाज कल्याण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित या शिबिरात वेवोतोलू केजो यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात मंचावर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. दिगंबर कटयारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार हा काळाची गरज

शिबिराचे उद्घाटन पाण्याचा दिवा पेटवून करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला योगेश पाटील यांनी शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान, अरुण पवार, दिलीप तिवारी आणि नेमीवंत धांडे यांनी शिक्षकांसमोरील आव्हानांबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना विकसित करताना शिक्षकांनी वैज्ञानिक आणि सामाजिक जाणीवा कायम जागृत ठेवणे आवश्यक आहे.

प्रा. दिगंबर कट्यारे यांनी “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करताना, “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव. जितका पुरावा तितका विश्वास,” असे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये हा दृष्टिकोन रुजवण्याचे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

कायद्यांची माहिती आणि मानसिक आरोग्याविषयी चर्चा

द्वितीय सत्रात “जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा” याबाबत एड. भरत गुजर आणि जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे आणि जगदीश बैरागी यांनी ‘सर्प विज्ञान’ या विषयावर माहिती देऊन सापांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करण्यावर भर दिला.

अखेरच्या सत्रात मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी मन आणि मानसिक आजार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या प्राथमिक उपाययोजनांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिराचे सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. शिबिरात समाज कल्याण विभागातील अधिकारी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here