जळगाव समाचार | ४ मे २०२६
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाटा परिसरात मरिमाता मंदिराजवळ सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे गजानन हिरामण पाटील व सौ. अश्विनी गजानन पाटील अशी असून ते रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी होते. संबंधित दांपत्य आपल्या एक वर्षाच्या बालकासह धार्मिक दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, मात्र त्यांच्या सोबत असलेले लहान बाळ चमत्कारिकरित्या सुखरूप बचावले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

![]()




