सप्तश्रृंगी वणी गडावर लग्नपत्रिका अर्पण करून परतताना पाचोऱ्याजवळ अपघातात भावी वधू ठार आज सकाळी नववधूच्या अपघाती मृत्यू नंतर दुसऱ्या घटनेने हळहळला जळगाव जिल्हा…

 

जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२६

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील कुटुंबावर पाचोरा तालुक्यात भीषण अपघाताने काळाचा घाला घातला. बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून वाहनाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय भावी वधू शिका बेलसरे व ४२ वर्षीय मिनाताई मानकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर बातमी :
अमरावती जिल्ह्यातील हरम (ता. अचलपूर) येथील शिका बेलसरे यांच्या ८ मे रोजी होणाऱ्या विवाहानिमित्त कुटुंबीयांनी लग्नपत्रिका सप्तश्रृंगी गड येथे अर्पण करण्यासाठी भेट दिली होती. या प्रवासात शुभम बेलसरे, सुनील मानकर, शिका बेलसरे आणि मिनाताई सुनील बेलसरे हे सहभागी होते.

मंगळवारी (२९ एप्रिल) पहाटे दर्शन घेऊन कुटुंबीय चारचाकीने परतीच्या प्रवासाला निघाले. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेव परिसरात वाहनाचा अचानक टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात मिनाताई मानकर (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिका बेलसरे (वय २२) या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जय मल्हार रुग्णवाहिकेचे चालक बबलू मराठे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दरम्यान, नाशिककडे जात असलेले गोराडखेडा येथील सरपंच मनोज (आप्पा) पाटील यांनीही अपघातस्थळी थांबून जखमींना मदत केली.

गंभीर जखमी अवस्थेत शिका बेलसरे यांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच भावी वधूचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला आहे. आनंदाच्या क्षणी सप्तश्रृंगी मातेच्या आशीर्वादासाठी गेलेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अमरावती जिल्ह्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here