जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२६
धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी (दि. 29 एप्रिल) सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे निघालेल्या क्रूझर गाडीचे चालत्या स्थितीत चाक निखळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय 22) हिचा विवाह नुकताच वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी परतत असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. संबंधित क्रूझर (क्रमांक MH 30 AZ 4710) वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उलटून भीषण अपघात झाला.
या अपघातात नववधू पूजा रवी वागडकर हिच्यासह दत्तू तुळशीराम भागवत (वय 42) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला. आनंदाच्या वातावरणात निघालेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात प्रेम भारत वाकडकर (वय 24), नितेश सुरेश काठोडे (वय 35), अमोल दामोदर गीते (वय 35), रवी प्रभाकर वाघोडकर (वय 32), तुळशीराम भीमराव भागवत (वय 67) आणि अंश नितेश काठोडे (वय 14) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

![]()




