जळगाव समाचार | १७ ऑगस्ट २०२६
घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरी लिंक रोडवरील मानेनगर परिसरात घडली. तृप्ती विशाल सोनवणे (८) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (६) अशी मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी (दि. १५) सायंकाळी डॉ. विशाल सोनवणे हे त्यांच्या रासबिहारी-मेरी लिंक रोडवरील क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्या पत्नीही वैद्यकीय व्यवसायात त्यांना सहकार्य करतात. त्यावेळी दोन्ही मुली घरी खेळत होत्या.
दरम्यान, क्लिनिकमध्ये आलेल्या एका रुग्णाला सलाइन सुरू असल्याने डॉ. सोनवणे यांनी पत्नीला तिथेच थांबण्यास सांगितले आणि ते घरी गेले. मुलींना जेवण दिल्यानंतर आई काही वेळात घरी येईल, असे सांगून त्यांनी किचनचा दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून ते पुन्हा क्लिनिकमध्ये परतले.
काही वेळाने क्लिनिकमधील काम आटोपून डॉ. सोनवणे घरी आले. घर उघडल्यानंतर दोन्ही मुली दिसत नसल्याने त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना किचनलगतच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संशय आल्याने त्यांनी टाकीत पाहिले असता पाण्यात एका मुलीचे केस दिसले. त्यांनी तातडीने तिला बाहेर काढले. त्यानंतर दुसरी मुलगीही त्याच टाकीत असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच शेजारी अमोल पोतदार यांच्यासह नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही मुलींना रात्री सुमारे १०:३५ वाजता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री ११:१० वाजता दोन्ही बहिणींना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांनी म्हसरूळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार कविश्वर खराटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे. रविवारी दुपारी दोन्ही चिमुरड्या बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

![]()





