जळगाव समाचार | १७ ऑगस्ट २०२६
शिक्षण आणि कमाईच्या मुद्द्यावरून पत्नीला मानसिक त्रास देत, संतापाच्या भरात तिच्या गळ्याला कापडी उपरण्याने फास आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कासोदा येथील गढीवॉर्ड परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
निलेश भगवान पाटील आणि त्यांची पत्नी सुनाक्षी निलेश पाटील (वय २४) हे १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी सुनाक्षी यांना रडू आल्याने निलेशने त्यांना डोळे पुसण्यासाठी कापड दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, याचवेळी पांढऱ्या रंगाच्या कापडी उपरण्याने त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुनाक्षी यांनी केला आहे.
यापूर्वीही पतीकडून शिक्षण आणि कमाईवरून टोमणे मारले जात असल्याचे सुनाक्षी यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. “माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते, तू घरी बसून फुकट खातेस,” अशा शब्दांत निलेश मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.
या घटनेत सुनाक्षी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान सुनाक्षी यांनी दिलेल्या जबाबावरून कासोदा पोलीस ठाण्यात १६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. १२३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१) आणि ८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी निलेश भगवान पाटील याला अटक केली आहे. निलेश आणि सुनाक्षी हे मूळचे कासोदा येथील रहिवासी असून सध्या उमराव क्वार्टर, देवळाली कॅम्प, नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास कासोदा पोलीस करीत आहेत.

![]()





