जळगाव समाचार | २५ मे २०२६
देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ जाहीर केली. नव्या दरानुसार पेट्रोल प्रति लिटर २ रुपये ६१ पैशांनी, तर डिझेल प्रति लिटर २ रुपये ७१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत झालेली ही सलग चौथी दरवाढ ठरली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक ताणात आणखी भर पडली आहे. ऐन लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या वाढीमुळे वाहतूक, प्रवास आणि दैनंदिन खर्चावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१५ मेपासून इंधन कंपन्यांनी दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू केले असून तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ७ रुपये ५० पैशांची एकूण वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९९ रुपये ५१ पैशांवरून वाढून १०२ रुपये १२ पैसे प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर ९२ रुपये ४९ पैशांवरून ९५ रुपये २० पैसे प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. देशातील विविध महानगरांमध्येही याच धर्तीवर दरवाढ लागू करण्यात आली असून त्यामुळे मालवाहतूक क्षेत्रासह किरकोळ बाजारपेठेवरही त्याचे परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत.
दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जागतिक स्तरावरील भू-राजकीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. वाढलेल्या आयात खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध भारत-अमेरिका मैत्रीच्या आड येणार नसल्याचे विधान केल्याची चर्चा राजकीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असतानाच देशात इंधन दरवाढीचा मुद्दा अधिक तीव्र बनला आहे. आगामी काळात जागतिक बाजारातील परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट, प्रवास खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अतिरिक्त ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
![]()






