जिल्ह्यात उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू; लग्नानंतर अवघ्या २० दिवसांत संसार उध्वस्त…

 

जळगाव समाचार | १६ मे २०२६

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे नवविवाहितेचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली सुनील मोरे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. विवाहानंतर अवघ्या वीस दिवसांतच त्यांच्या निधनाने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वैशाली मोरे यांचे माहेर भडगाव तालुक्यातील बाळद येथे असून काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह मोहाडी येथील सुनील बाळू मोरे यांच्यासोबत झाला होता. नातेवाईकांच्या लग्न समारंभानिमित्त त्या मंगळवारी भर उन्हात दुचाकीने चोपडा येथे गेल्या होत्या. तीव्र उष्णतेत प्रवास केल्यानंतर बुधवारी घरी परतल्यानंतर त्यांना अचानक मळमळ, चक्कर येणे तसेच अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती मिळाली.

प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल देसले यांनी तपासणी केली असता उष्माघाताची लक्षणे आढळून आली. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, जळगावला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या वैशाली मोरे यांच्या अकाली निधनामुळे मोहाडी व बाळद परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक प्रवास टाळावा, पुरेसे पाणी प्यावे तसेच उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here