गांधी विचारांचा दीपस्तंभ आजही मार्गदर्शक : डॉ. प्रशांत बोकारे

 

जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६

महात्मा गांधी यांचे विचार काल, आज आणि भविष्यातही समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ ठरतील, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत एस. बोकारे यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदवी प्रदान समारंभात दीक्षांत भाषण करताना त्यांनी गांधी विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. या कार्यक्रमाला अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार तसेच गीता धर्मपाल यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी काहींनी आपल्या अनुभवांची मांडणीही यावेळी केली.

आपल्या भाषणात डॉ. बोकारे यांनी आजचे शिक्षण केवळ ‘उपयोगी’ विषयांपुरते मर्यादित राहिल्यास विचारस्वातंत्र्यावर मर्यादा येण्याचा धोका असल्याचे सांगितले. गांधी विचारांचा अभ्यास करताना ‘यातून उद्योग चालेल का, बाजारपेठ वाढेल का’ असे प्रश्न उपस्थित होतात, मात्र स्वातंत्र्याचा खरा अर्थ विचारस्वातंत्र्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Round Table Conferences दरम्यान गांधीजींनी मांडलेले चरखा व ग्रामोद्योगाचे तत्त्व आजही आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण महिलांना चरख्यामुळे मिळालेल्या उत्पन्नाचा दाखला देत आजच्या काळातही ग्रामविकासासाठी या संकल्पना उपयुक्त ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडवणारी साधना असल्याचे सांगितले. ‘कर्म आणि विचार यांचा समतोल राखणे आवश्यक असून गुणांपेक्षा वैयक्तिक विकास महत्त्वाचा आहे,’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासत स्वतःची समृद्धीची व्याख्या निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले तर आभारप्रदर्शन दीपक मिश्रा यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here