जळगाव समाचार | १ मे २०२६
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेला राज्यभरातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये एकूण निकालाची टक्केवारी, विभागनिहाय निकाल आणि इतर महत्त्वपूर्ण आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येणार असून ही गुणपत्रिका तात्पुरती मान्य राहणार आहे. मूळ छापील गुणपत्रिका मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अर्ज आणि इतर शैक्षणिक कामांसाठी याच ऑनलाइन गुणपत्रिकेचा वापर करता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सहजपणे आपले गुण तपासता येणार आहेत.

![]()




