यावल शहरात दहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी; लवकरच भूमिपूजन, नगराध्यक्षा छायाताई पाटलांची माहिती

 

जळगाव समाचार | २३ सप्टेंबर २०२६

यावल शहरातील विविध भागांतील प्रलंबित विकासकामांना मंजुरी मिळाल्याने यावलच्या विकासाला आता गती मिळणार आहे. नगरपरिषद हद्दीतील सुमारे दहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिली. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने ही कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

सातोद रोड परिसरात २ कोटी २९ लाख रुपयांची पाण्याची टाकी, अक्सा नगर येथे ८० लाखांचे डांबरीकरण, कृष्ण तारानगरमध्ये रस्ता व गटारासाठी ६० लाख, मदिना नगरमध्ये रस्ता-गटारासाठी ६० लाख, बाबा नगरमध्ये गटारासाठी ४० लाख, तसेच फैजपूर–चोपडा रस्त्यावरील डिव्हायडर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. याशिवाय पंडितनगर, बालाजी सिटी, खिन्नीपुरा, वाणी गल्ली, पांडुरंग सराफ नगर आदी भागांत रस्ते व गटारांची कामे करण्यात येणार आहेत.

साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडील नवीन प्रवेशद्वारासाठी १० लाख, ओपन जिमसाठी ११ लाख, विद्यालयाच्या रंगकामासाठी २० लाख, बारीवाड्यात संत रूपलाल महाराज प्रवेशद्वारासाठी ८ लाख, शहरात शेतकरी दांपत्याचे शिल्प उभारण्यासाठी ८ लाख, तीन ठिकाणी वॉटर एटीएमसाठी १० लाख, इनडोअर जिमसाठी १५ लाख, वृक्षारोपणासाठी ५ लाख आणि कलाकार कट्ट्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पाच ठिकाणी शौचालय व मुतारी बांधकामासाठी ९५ लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून, शहरातील कचरा संकलन व प्रक्रियेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावल शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी शववाहिनी तसेच शहरासाठी शवरथ खरेदीसाठी सुमारे ४० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.

या विकासकामांसाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, सहकारी नगरसेवक, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व अभियंत्यांचे सहकार्य लाभल्याचे सौ. छायाताई अतुल पाटील यांनी नमूद केले. निधी व प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी जळगाव, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. “नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार आवश्यक विकासकामांना प्राधान्य दिले असून, मंजूर कामांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल. उर्वरित कामांसाठीही पाठपुरावा सुरू राहील,” असे नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here