महाराष्ट्राची वाघीण म्हणून ओळख असलेल्या कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची नळदुर्ग किल्ल्यावरून तीन मुलांसह उडी; त्यांच्यासह २ मुलांचा मृत्यू , १ गंभीर

 

जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२६

धाराशिव जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. धाराशिव येथील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यावरील सुमारे १०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी जुळी मुलगी वीरा गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

कुस्ती क्षेत्रात अश्विनी पौळ यांची ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख होती. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कारकिर्दीत पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके मिळवली होती. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २००८ आणि २००९ मध्ये गुरुदासपूर व चेन्नई येथेही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले. पुढील काळात भोपाल, कानपूर, हरियाणा, बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई येथील स्पर्धांमध्येही त्यांनी पदकांची कमाई केली.

अश्विनी यांचे संपूर्ण कुटुंब कुस्तीशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, आई, भाऊ आणि बहीण हेही कुस्ती क्षेत्राशी संबंधित असून, त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू आहेत. वडिलांच्या प्रोत्साहनातून अश्विनी यांनी घरातूनच कुस्तीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरीच तालीम उभारली होती.

दरम्यान, पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याने अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासह घटनेमागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या या कुस्तीपटूच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here