जळगाव समाचार | ३१ जुलै २०२६
अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने जळगाव शहरातील महापालिकेच्या मानसूनपूर्व नियोजनाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून रस्ते, कॉलन्या आणि नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या तथाकथित ‘विश्वकर्मा’ बंगल्यातच रस्त्यावरील पाणी शिरल्याचा. स्वतः जबाबदार अधिकाऱ्यांचे घरच पाण्यापासून सुरक्षित राहू शकले नाही, तर सामान्य नागरिकांची अवस्था किती बिकट झाली असेल, याची कल्पना सहज करता येते.
शहरातील रस्ते, गटारी आणि जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाही प्रत्यक्षात कोणतीही परिणामकारक व्यवस्था उभी राहिल्याचे दिसले नाही. परिणामी, एकाच दिवसाच्या जोरदार पावसाने जळगाव शहर अक्षरशः मुंबईप्रमाणे तुंबल्याचे चित्र निर्माण झाले. नागरिक सोशल मीडियावर “मुंबईची तुंबई जशी होते, तसाच जळगावचाही तुंबाड झाला” अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत आधीपासूनच विविध तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, या घटनेने त्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले आहे. विरोधक आणि नागरिकांकडून मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होत असून, विकासकामांच्या गुणवत्तेपेक्षा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतातून केवळ “मलाई” खाल्ली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनावरही नागरिकांचा संताप उसळला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी, रील्स आणि दिखाऊ उपक्रमांमध्ये व्यस्त राहण्यापेक्षा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, जलनिस्सारण आणि रस्त्यांचे नियोजन प्रभावीपणे केले असते, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती, अशी भावना व्यक्त होत आहे. एका मुसळधार पावसाने प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी उघड केल्याचे चित्र असून, यापुढे दोषींवर जबाबदारी निश्चित करून ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याचबरोबर आकाशवाणी ते एसपी बंगला या रस्त्याच्या कामावरही पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाच्या कालावधीत १० महिने होऊन बदली झाली मात्र जळगावतच ठाण मांडून बसलेले तत्कालीन उपअभियंता गिरीश सूर्यवंशी, तत्कालीन कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे लाच घेतांना रंगेहात पकडले गेलेले शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्या कार्यकाळात हे काम झाल्याचे सांगितले जात आहे. या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही विविध स्तरांवर चर्चा झाली होती. आता पावसाचे पाणी थेट मुख्य अभियंता यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, या कामांतील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे परिणाम आता संबंधित यंत्रणेलाच भोगावे लागत आहेत काय? अशी शहरात होत आहे.

![]()





