जळगाव समाचार | १८ सप्टेंबर २०२६
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी १८ रोजी सकाळी मेहरूण तलावाच्या गणेश घाटाला भेट देऊन विसर्जन तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले आणि अभियंता आर. टी. पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
घाटावर लावण्यात आलेल्या निर्माल्य कलश आणि संकलन डब्यांची पाहणी करताना, अनेक नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य आणल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी यापुढे प्लास्टिकचा वापर न करता कागदी वर्तमानपत्रातच निर्माल्य गुंडाळून आणावे, असे आवाहन महापौरांनी केले.
पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांशी महापौरांनी या वेळी संवाद साधून पालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली. विसर्जनादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी घाटावर आरोग्य कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आणि वैद्यकीय पथक २४ तास तैनात ठेवण्याचे निर्देश दिले.
विसर्जनासाठी लागणाऱ्या एकूण मनुष्यबळाचा आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला. गणेशोत्सव पर्यावरणापूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
![]()






