जळगाव समाचार | १० जानेवारी २०२५
नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या पहिल्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या हिंदुत्वावर बोट उचलणाऱ्या भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे गेले, असा खडा सवाल करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचे हिंदुत्व हे खरे की केवळ निवडणूकपुरते मर्यादित आहे, अशी विचारणा करत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
भाषणाच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप डंका पिटत असला, तरी प्रभू रामांनी वास्तव्य केलेल्या नाशिकमध्ये झाडतोड झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्या कोणी प्रभू राम कुठे राहिले होते, असा प्रश्न विचारला तर ‘नमो निवास’ दाखवणार का, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. काँग्रेससोबत आघाडी केली म्हणून आमचे हिंदुत्व संपले, असा आरोप केला जातो; मग भाजपने एमआयएमशी युती केली तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचारी, चोर आणि दरोडेखोरांना पक्षात घेऊन भाजप वाढवला जात आहे. “भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा, तेवढा भाजप वाढवावा,” अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजप हा ‘उपट सुंभांचा पक्ष’ असल्याची टीका करत, आमच्यातील अनेक लोक पळवले गेले असले तरी आमच्याकडे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची कमी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांविषयीही चिंता व्यक्त केली. आजही त्यांना भ्रष्ट लोकांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधला. पक्ष वाढवण्यासाठी कुणालाही स्वीकारले जात असून, त्याचा भार मूळ कार्यकर्त्यांना सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या ध्वजातील हिरवा रंग काढून टाका, मग आमच्यावर बोला, असे आव्हान देत हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असून आमचे हिंदुत्व व्यापक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सभा संपताना उद्धव ठाकरे यांनी नाशिककरांना विश्वास देत सांगितले की, ठाकरे बंधू जे बोलतात ते करून दाखवतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सोबत असल्याचा आनंद व्यक्त करत, येणाऱ्या काळात नाशिकचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भावी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर शहराच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा शब्द देत त्यांनी भाषणाची सांगता केली.

![]()




