आसाममध्ये सुखोई एसयू-३० एमकेआय विमान कोसळले; महाराष्ट्रातील फ्लाइट लेफ्ट पूर्वेश दुरगकर शहीद

 

जळगाव समाचार | ६ मार्च २०२६

आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे दोन्ही वैमानिक शहीद झाले आहेत. हवाई दलाने आज, ६ मार्च रोजी पहाटे एकच्या सुमारास या अपघाताची अधिकृत पुष्टी केली, तर सकाळी सुमारे सव्वा नऊच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील अधिकृत पोस्टद्वारे दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे सुपूत्र असल्याने या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर असताना अचानक जमिनीवरील नियंत्रण केंद्राशी त्याचा संपर्क तुटला. रडारवरून विमान गायब झाल्यानंतर हवाई दलाने तात्काळ अलर्ट जारी करून शोधमोहीम सुरू केली. अपघात नेमका कुठे आणि कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी हवाई दलाची विशेष चौकशी टीम आसाममध्ये दाखल झाली असून दुर्घटनेची कारणमीमांसा करण्याचे काम सुरू आहे. लष्कर आणि स्थानिक यंत्रणांच्या मदतीने कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलातील अत्याधुनिक आणि शक्तिशाली बहुउद्देशीय लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. दोन इंजिन असलेले हे विमान हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले तसेच देखरेखीच्या मोहिमांसाठी वापरले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रचंड वेगामुळे भारतीय हवाई दलाच्या सामरिक क्षमतेत या विमानाची महत्त्वाची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here