शनिपेठेत वरिष्ठांवर बदलीची कुऱ्हाड; कथित वसुलीचे सूत्रधार मात्र सुरक्षित?

 

कनिष्ठ कर्मचारी आणि बीट अंमलदारांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

जळगाव समाचार | ९ नोव्हेंबर २०२६

शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सट्टा-जुगार, अवैध दारूविक्री, विनापरवाना प्रवासी वाहतूक आणि गोवंश मांसाची बेकायदेशीर विक्री यांसारख्या अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि स्थानिक पातळीवरून मिळणाऱ्या कथित राजाश्रयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्तव्यपालनात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस प्रशासनाने शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असली, तरी मूळ प्रश्न अद्याप कायम आहे. केवळ मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई करून अवैध धंद्यांचे हे साम्राज्य नष्ट होणार का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे पोलीस ठाण्यातीलच काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आणि बीट अंमलदारांची संशयास्पद भूमिका असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे. पोलीस निरीक्षकांची बदली झाली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून कथित “वसुलीचे बकासुर” कर्मचारी मात्र अद्यापही कारवाईच्या कक्षेबाहेर आहेत. जुगार, सट्टा-पत्ता चालक, अवैध विक्रेते आणि अगदी काही स्थानिक दुकानदारांकडूनही ठराविक रक्कमेची सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. हा कर्मचारी अद्यापही मोकाट फिरत असल्याने वरिष्ठांच्या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही कारवाई केवळ जनतेचा रोष शांत करण्यासाठी केलेली मलमपट्टी आहे की यामागील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शनिपेठ परिसरातील अवैध व्यवसायांची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली असून, काही दिवसांपूर्वी घडलेल्या बोगस डॉक्टरच्या प्रकरणावरून हे स्पष्ट झाले होते. तत्कालीन परिरक्षावधीन अधिकारी सह्याद्री विरले यांनी जळगावातील एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती, त्यावेळेस संबंधित संशयिताने आपण स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याला नियमित हप्ता देत असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. इतकेच नव्हे तर, परिसरात गोवंश तस्करी आणि मांसाची अवैध विक्री उघडपणे सुरू असतानाही स्थानिक बीट कर्मचाऱ्यांकडून त्याकडे हेतुपरस्सर डोळेझाक केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या आहेत. गुन्हेगारांना प्रत्यक्ष अभय देणारे हेच कर्मचारी पडद्याआड सुरक्षित राहत असल्याने पोलीस खात्याच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

अवैध धंद्यांचे हे रॅकेट एका दिवसात उभे राहिलेले नसून त्यामागे पोलीस कर्मचारी आणि गुन्हेगारांचे साटेलोटे असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे केवळ पोलीस निरीक्षकांची बदली करून हा प्रश्न सुटणारा नसून, या भागात नेमके कोणते अवैध धंदे चालतात, त्यांना कोणत्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण होते आणि वसुलीचा पैसा नेमका कुणाकुणा पर्यंत पोहोचतो, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत वसुली करणाऱ्या आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी करणाऱ्या या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत शनिपेठ हद्दीतील गुन्हेगारी मोडीत निघणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या कथित वसुलीच्या साखळीचा फास कधी आवळतात, याकडे जळगावकर डोळे लावून बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here