जळगाव समाचार | १७ जुलै २०२६
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १९ जुलै रोजी होणारा तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा व अंतिम सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, असा दावा विविध माध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा निवड समितीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
वृत्तांनुसार, आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नियोजनातून रोहित शर्माला वगळण्यात आल्याची माहिती त्याला देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेपर्यंत रोहितचे वय ४० वर्षांपर्यंत पोहोचणार असल्याने भारतीय संघात दीर्घकालीन बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तरुण आणि तंदुरुस्त खेळाडूंना संधी देण्याचा विचार निवड समिती आणि संघ व्यवस्थापन करत असल्याचे सांगितले जात आहे.
रोहित शर्माच्या अलीकडील कामगिरीचाही या निर्णयामागे महत्त्वाचा घटक असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला अपेक्षित धावसंख्या उभारता आलेली नाही. यंदाच्या वर्षात आठ एकदिवसीय डावांत त्याने ३०.१२ च्या सरासरीने २४१ धावा केल्या असून, त्याच्या फलंदाजीतील सातत्य आणि स्ट्राइक रेटमध्येही घट झाल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी नव्या संघबांधणीवर भर दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांसारखे युवा पर्याय संघाकडे उपलब्ध असल्याने भविष्यातील संघरचनेत त्यांना अधिक संधी मिळू शकते, असेही वृत्तांमध्ये म्हटले आहे. जैस्वालने मर्यादित संधींमध्ये प्रभावी कामगिरी करत दोन शतके झळकावली आहेत, तर इशान किशनने पुनरागमनानंतर फलंदाजीबरोबरच यष्टिरक्षक म्हणूनही उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे भारतीय संघ २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी नव्या पिढीच्या खेळाडूंवर विश्वास दाखवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा रंगली आहे.

![]()





