जळगाव समाचार | १७ जुलै २०२६
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ या प्रमुख मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यास जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्षांतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कामासाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामामुळे वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार प्रकाश व्यवस्था उपलब्ध होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
या प्रस्तावाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभल्याने निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाली. याबद्दल आमदार सुरेश दामु भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या कामांसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक निधी शहरात आणण्याचा प्रयत्न कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

![]()





