जळगाव समाचार (क्रिकेट) | ३० जुलै २०२६
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य मधुकर रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर भावनिक व्हिडिओ आणि संदेश प्रसिद्ध करत त्याने हा निर्णय जाहीर केला. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच देशभरातील क्रिकेटप्रेमींचे मनापासून आभार मानत त्याने आपल्या दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भावपूर्ण निरोप दिला.
गेल्या तीन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेने योग्य वेळ आल्याची जाणीव झाल्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे आपल्या संदेशात स्पष्ट केले. “जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात आणि एक शेवट असतो. त्या क्षणाचा सन्मान करून पुढे जाणे आवश्यक असते. माझ्या फलंदाजीप्रमाणेच मी योग्य वेळेवर नेहमी विश्वास ठेवला आणि आज मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे,” असे भावनिक शब्दांत त्याने म्हटले आहे. रहाणेने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना २० जुलै २०२३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये, तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये झाला होता.
अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे २०२०-२१ मधील ऑस्ट्रेलिया दौरा ठरला. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व करत ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २-१ अशा फरकाने जिंकून दिली. अॅडलेड कसोटीत भारताचा डाव अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आल्यानंतर मेलबर्न कसोटीत त्याने शतकी खेळी साकारत संघाला पुनरागमन करून दिले. त्या मालिकेतील त्याचे नेतृत्व, संयम आणि फलंदाजी भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षणांपैकी एक मानले जाते.
३१ ऑगस्ट २०११ रोजी इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून, ३ सप्टेंबर २०११ रोजी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आणि २२ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधून रहाणेने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. परदेशातील कठीण खेळपट्ट्यांवर त्याने अनेक संस्मरणीय शतके झळकावली. लॉर्ड्स, मेलबर्न, जोहान्सबर्ग, वेलिंग्टन आणि किंग्स्टन येथील त्याच्या खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहेत. फलंदाजीसोबतच स्लिपमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याने भारतीय संघाला महत्त्वाचे योगदान दिले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अजिंक्य रहाणेने ८५ कसोटी सामन्यांत ५,०७७ धावा करत १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ आहे. ९० एकदिवसीय सामन्यांत त्याने २,९६२ धावा, तीन शतके आणि २४ अर्धशतके नोंदवली असून सर्वोच्च धावसंख्या १११ राहिली. तसेच २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३७५ धावा करत एक अर्धशतक झळकावले असून सर्वोच्च धावसंख्या ६१ आहे. शांत स्वभाव, तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाजी, परदेशातील दमदार कामगिरी आणि प्रेरणादायी नेतृत्वामुळे अजिंक्य रहाणेचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम आदराने घेतले जाईल.

![]()





