जळगाव समाचार | ९ मे २०२६
जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ अटक केली. योगेश अहिरे असे अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठ्या रकमेचे बिल प्रलंबित होते. संबंधित बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज आणि कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी यापूर्वीही चर्चेत राहिल्या आहेत. अशातच झालेल्या या कारवाईमुळे विभागातील कार्यपद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित घटनेची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.

![]()




