जळगाव समाचार | १९ मे २०२६
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर पुन्हा दिसून आला असून, मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली. चालू आठवड्यातील ही दुसरी मोठी दरवाढ ठरली असून, वाढत्या महागाईमुळे आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यापूर्वी गेल्या शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा दरवाढ झाल्याने इंधन दरवाढीचे सत्र सुरूच राहणार का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मागील एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण ३ रुपये ९० पैशांची वाढ झाल्याने वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मंगळवारच्या नव्या दरवाढीनंतर पेट्रोल ९१ पैशांनी महागले असून, प्रतिलीटर पेट्रोलचा दर १०७ रुपये ५९ पैशांवर पोहोचला आहे. डिझेलच्या दरातही ९४ पैशांची वाढ झाली असून, मुंबईत डिझेल ९४ रुपये ०८ पैशांनी विकले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ८७ पैशांनी वाढून ९८ रुपये ६४ पैसे प्रतिलीटर झाले आहे, तर डिझेलचा दर ९१ रुपये ५८ पैशांवर गेला आहे.
कोलकाता येथे पेट्रोलच्या दरात सर्वाधिक ९६ पैशांची वाढ नोंदविण्यात आली असून, तेथील पेट्रोलचा दर १०९ रुपये ७० पैशांवर पोहोचला आहे. डिझेलही ९४ पैशांनी महागून ९६ रुपये ०७ पैसे प्रतिलीटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ८२ पैशांनी वाढून १०४ रुपये ४९ पैसे प्रतिलीटर झाले असून, डिझेलचा दर ९६ रुपये ११ पैशांवर पोहोचला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्यांदा दरवाढ केल्याने येत्या काळात महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून, त्याचा परिणाम भाजीपाला, दूध तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यनिहाय स्थानिक कर आणि मूल्यवर्धित करातील फरकामुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढलेले असू शकतात. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
![]()






