शरातील प्रमुख मार्गावरील दुभाजक विकास कामात भंगाळे गोल्डकडून मनपा नियमांचे उल्लंघन; कार्यवाहीसह करार रद्द करण्याची मागणी


जळगाव समाचार | १९ मे २०२६

जळगाव शहरातील दुभाजक सुशोभीकरणाच्या कामावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून, स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा मार्गावरील दुभाजक विकास कामात नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित करार रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

जळगाव महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण, स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी विविध संस्था व व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दुभाजकांची रंगरंगोटी, झाडे-फुलझाडांची लागवड, परिसराची स्वच्छता आणि नियमित देखभाल करणे संबंधित संस्थांना बंधनकारक आहे. तसेच जाहिरात फलकांमध्ये ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा संबंधित व्यावसायिकांच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. याशिवाय प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटर अंतर ठेवणे आवश्यक असल्याचेही करारात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या मार्गावरील दुभाजकांवर भंगाळे गोल्डकडून लावण्यात आलेल्या फलकांमध्ये महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख नसून संपूर्ण जागा स्वतःच्या जाहिरातींसाठी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फलकांमधील आवश्यक अंतराचाही नियम पाळण्यात आलेला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, भंगाळे गोल्डकडून यापूर्वीही शहरात अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या असून, महानगरपालिकेकडून काहीवेळा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तरीदेखील नियमभंग सुरूच असल्याने संबंधित करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी ॲड. पाटील यांनी केली आहे.

तसेच, सर्वसामान्य नागरिक आणि लहान व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून कठोर कारवाई केली जाते, तर प्रभावशाली व्यावसायिकांबाबतही प्रशासन समान निकष लावणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत महापौर, आयुक्त तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त होत असून, संबंधित व्यावसायिकांचे पुतणे हे महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाशी संबंधित असून ते विद्यमान नगरसेवक व माजी महापौर आहेत. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते आणि नियमभंगाच्या आरोपांवर काय कारवाई करते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here