दहा वर्षांच्या संघर्षानंतर वृद्ध महिलेला वडिलोपार्जित जमिनीचा वारसा हक्क

 

जळगाव समाचार | ११ जून २०२६

एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द येथील मीराबाई सुरेश मराठे या निरक्षर विधवा वृद्ध महिलेला तब्बल दहा वर्षांच्या संघर्षानंतर वडिलोपार्जित शेतजमिनीवरील वारसा हक्क मिळाला आहे. भाऊबंदकीच्या वादातून त्यांचा जमिनीवरील हक्क हिरावला गेला होता. भावाने परस्पर शेतजमीन विक्री केल्याने न्याय मिळविण्यासाठी मीराबाई मराठे यांनी महसूल प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. अखेर गट क्रमांक ३९ मधील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव नोंदविण्यात आले.

न्यायाच्या शोधातील या प्रदीर्घ लढ्यात मीराबाई मराठे यांनी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर त्यांनी आपली व्यथा मांडली असता त्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित महसूल प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. मात्र त्यानंतर त्यांची बदली झाल्याने प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहिला.

यानंतर नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यापर्यंत मीराबाई मराठे पोहोचल्या. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम ऐकून एरंडोलचे प्रांताधिकारी यांना तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेनंतर खेडी खुर्द येथील संबंधित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मीराबाई मराठे यांचे नाव वारसदार व सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्यात आले.

सातबारावर स्वतःचे नाव पाहिल्यानंतर मीराबाई मराठे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचीही भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. एका वृद्ध महिलेच्या चिकाटीला आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपाला अखेर यश मिळाल्याने परिसरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here