ब्रेकींग; जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

 

जळगाव समाचार | ९ जून २०२६

राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करत राज्य शासनाने चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली आहे. या फेरबदलांत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या बदल्याबाबत प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर राज्य शासनाने जारी केलेल्या अधिकृत आदेशातून या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणमध्ये संयुक्त संचालक (जॉइंट डायरेक्टर) म्हणून कार्यरत असलेले आदित्य जीवने आता जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. युवा आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जीवने यांच्याकडे आता शहराच्या विकासकामांसह महापालिकेच्या प्रशासनाची धुरा सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असली, तरी त्यांची पुढील नियुक्ती नेमक्या कोणत्या पदावर किंवा ठिकाणी करण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. शासनाच्या आदेशात यासंदर्भात कोणताही तपशील नमूद करण्यात आलेला नसल्याचे समजते.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नव्या आयुक्तांच्या नियुक्तीनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीत आणि विकासकामांच्या गतीत कोणते बदल होतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील विविध प्रलंबित प्रकल्प, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सेवांबाबत नव्या आयुक्तांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता देखील व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here