इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे होर्मुज ठप्प; वाढत्या तेलाच्या दरामुळे भारतावर आर्थिक संकट गडद

 

जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६

मध्यपूर्वेत इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचे परिणाम आता जागतिक पातळीवर तीव्रतेने जाणवू लागले आहेत. या संघर्षामुळे जगातील अत्यंत महत्त्वाचा तेलवाहतुकीचा मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी जवळपास ठप्प झाली असून, जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो.

लष्करी हालचाली आणि नौदल तणावामुळे या मार्गावरील तेल टँकर्सची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी जागतिक पुरवठा साखळी ढासळली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असून, परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास हे दर १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार सुमारे १ अब्ज बॅरल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘सप्लाय शॉक’ ठरू शकतो.

या घडामोडींचा सर्वाधिक फटका भारतासारख्या आयातदार देशांना बसण्याची शक्यता आहे. भारत आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे ९० टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम देशांतर्गत पेट्रोल-डिझेल दरांवर होण्याची शक्यता असून, वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव वाढून चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान, अमेरिकाने इराणच्या बंदरांवर नौदलाचा दबाव वाढवला असून, तेलवाहतूक रोखण्यासाठी कारवाया तीव्र केल्या आहेत. मध्यपूर्वेत अत्याधुनिक शस्त्रसज्जता वाढवण्याच्या हालचालीही सुरू असल्याने संघर्ष लवकर निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही बाजूंनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. परिणामी हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here