राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची पुनर्नियुक्ती

 

जळगाव समाचार | ९ जुलै २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी (८ जुलै) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी महानगराध्यक्ष म्हणून केलेल्या संघटनात्मक कामगिरीची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या लाडवंजारी यांनी यापूर्वी भाजपचे महानगराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर लाडवंजारी यांनी जळगाव महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळ सदस्य म्हणून विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव आहेत. नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि महिलांना साड्यांचे वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविल्याने त्यांची सामाजिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे जळगाव शहरातील पक्ष संघटना अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला.

लाडवंजारी यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्कर काळे, प्रदेश चिटणीस इजाज मलिक, दिलीप खोडपे, वाय. एस. महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, विकास पवार, राजू मोरे, सुनील माळी, किरण राजपूत, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, विनायक पाटील, रिंकू चौधरी, सुरेश पगारे, गौरव वाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. नियुक्तीनंतर लाडवंजारी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक प्रभाग आणि घराघरांत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही देत, प्रदेश नेतृत्वाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जळगाव शहरातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here