जळगाव समाचार | २२ नोव्हेंबर २०२५
शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह राज्य नाट्य स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्याची रंगकर्म्यांची मागणी सुरू असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. डी. पाटील यांनी हे शासकीय नाट्यगृह एका खासगी व्यावसायिक संस्थेला विनामोबदला तालमीसाठी उपलब्ध करून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे जळगावातील रंगकर्मींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्य शासनाने सांस्कृतिक चळवळ वाढावी म्हणून उभारलेले हे नाट्यगृह पूर्वी एका खासगी संस्थेकडे चालविण्यास देण्यात आले होते. त्यावेळी एका शिफ्टचे सुमारे ४५ हजार रुपये भाडे आकारले जात होते; मात्र देखभाल अभावी नाट्यगृह काही काळ बंद होते. याच पार्श्वभूमीवर राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्यगृह खुलं करण्याची मागणी रंगकर्म्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर नाट्यगृहाचे काम वेगाने सुरू झाले.
दरम्यान, दुरुस्तीच्या कारणावरून नाट्यगृह उघडण्यात आले असतानाच, आर. डी. पाटील यांनी एका खासगी व्यावसायिक संस्थेला कोणतेही भाडे न आकारता नाट्यगृहात तालमी करण्याची परवानगी दिल्याचा आरोप रंगकर्मींनी केला आहे. नियमाप्रमाणे चार तासांच्या सरावासाठी सुमारे २५ हजार रुपये भाडे आणि लाईटबिल आकारले जाते. मात्र विनामोबदला सुविधा देऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका संस्थेला विशेष मेहरबानी करून इतर कलाकार व संस्थांशी दुजाभाव केल्याची भावना रंगकर्मींनी व्यक्त केली असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून नुकसानभरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा संस्थेकडून दंडासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांवर सेवेतील बेफिकीरीबद्दल निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही कलावंतांकडून होत आहे.

![]()




