कोल्हे हिल्स परिसरात घरासमोर लघुशंकेवरून वाद; चॉपर हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

 

जळगाव समाचार | ५ जून २०२६

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या मृत्यूत झाले आहे. राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्यावर झालेल्या चॉपर हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात पोलिसांनी खुनाचे कलम वाढविले आहे. ही घटना १ जून रोजी घडली होती, तर ३ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना राहुलची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी समता नगर येथील हर्षल संतोष घुगे (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जून रोजी तो, राहुल वाघोदे आणि नितीन सैनी हे तिघे मित्र सुमित लोखंडे याच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणापूर्वी सर्वांनी कोल्हे हिल्स परिसरातील टेकडीवरील मोकळ्या जागेत मद्यपान केले. राहुलने अतिप्रमाणात मद्यसेवन केल्याने सुमित लोखंडे याने सर्वांना शकुंतला अपार्टमेंटच्या मागील बाजूस असलेल्या आपल्या घरी विश्रांतीसाठी नेले होते.

यावेळी राहुल वाघोदे घराबाहेर येऊन घरासमोर लघुशंका करू लागल्याचे पाहून सुमित लोखंडे याची मैत्रीण तमन्ना हिने त्याला जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर सुमित लोखंडे आणि तमन्ना यांनी राहुलला चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. राहुलचे मित्र हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना तमन्ना घरात गेली आणि तेथून धारदार चॉपर आणून राहुलच्या छाती व पोटाच्या मधल्या भागात वार केला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की चॉपर राहुलच्या शरीरात अडकून राहिला आणि तो गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

घटनेनंतर राहुलला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ३ जून रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सुमित लोखंडे आणि त्याची मैत्रीण तमन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुलच्या मृत्यूनंतर खुनाचे कलमही वाढविण्यात आले आहे. संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here