जळगाव समाचार | ५ जून २०२६
अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाया करत भेसळीचा संशय असलेले तसेच मानकांबाह्य अन्नपदार्थ आणि शीतपेयांचा तब्बल २ लाख ३१ हजार ६६० रुपयांचा साठा जप्त केला आहे. लस्सी, रतलामी शेव, रिफाइन्ड सोयाबीन तेल आणि कॅफिनयुक्त शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील बांबरुळ फाटा परिसरातील एका उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. यावेळी उत्पादित लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. तसेच भेसळीचा संशय निर्माण झाल्याने लस्सीचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. या कारवाईत २०० मिली क्षमतेची ७५० लस्सी पॅकेट्स जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत २२ हजार ५०० रुपये आहे. त्याच दिवशी जळगाव एमआयडीसी परिसरातील एका फरसाण उत्पादक युनिटची तपासणी केली असता उत्पादन प्रक्रियेमध्ये अस्वच्छता तसेच पुन्हा-पुन्हा वापरण्यात आलेल्या खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वापरलेल्या तेलासह जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून १४.९ किलो रतलामी शेवचा ७ हजार ८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरात खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आलेल्या रिफाइन्ड सोयाबीन तेलावरही प्रशासनाने कारवाई केली. अन्न सुरक्षा मानकांनुसार पॅकिंग न करता खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे आढळल्याने तेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. यावेळी ३५८ किलो खाद्यतेलाचा ५७ हजार २८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित तेलाचा उत्पादक शोधण्यासाठी चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ग्राहकांनी केवळ पॅकबंद खाद्यतेलाची खरेदी करावी आणि अन्न व्यवसायिकांनी खुल्या स्वरूपात खाद्यतेल विक्री टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ४ जून रोजी जळगाव एमआयडीसीतील एका शीतपेय वितरक व विक्रेत्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. ‘ब्लॅक बगीरा’ या कॅफिनयुक्त कार्बोनेटेड शीतपेयाच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्याने तसेच उत्पादन मानकांनुसार नसल्याचा संशय व्यक्त झाल्याने त्याचा नमुना विश्लेषणासाठी पाठविण्यात आला. यावेळी २०० मिली क्षमतेच्या ७ हजार ४४० बाटल्यांचा १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात कारवाईसाठी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून बाजारातील उपलब्ध साठा परत मागविण्याबाबत उत्पादकास नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे व सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईत सहायक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, किशोर साळुंके, योगराज सूर्यवंशी आणि अमोल जगताप यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात कुठेही भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
![]()






