जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२६
महिनाभरापूर्वीच्या ‘आत्महत्ये’चे गूढ उकलले; एमआयडीसी पोलिसांच्या तपासात खळबळजनक सत्य समोर — दोरी जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न
मोहाडी (ता. जळगाव) येथे महिनाभरापूर्वी झालेल्या एका तरुणाच्या कथित आत्महत्येचे गूढ अखेर उकलले असून, ही आत्महत्या नसून गळफास देऊन केलेला खून असल्याचे एमआयडीसी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, सततच्या दारूच्या व्यसनाला आणि मारहाणीला वैतागून आई, वडील आणि भावानेच संगनमत करून तरुणाचा जीव घेतल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मोहाडी येथील राधेशाम हरचंद राठोड (वय २६) याने ३१ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी समोर आली होती. मात्र, प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
तपासादरम्यान राधेशामच्या मृत्यूमागे कौटुंबिक वाद आणि त्याच्या दारूच्या व्यसनाचा मुद्दा असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आई मीराबाई राठोड, वडील हरसिंग राठोड आणि भाऊ सचिन राठोड यांनी संगनमत करून राधेशामचा गळफास आवळून खून केल्याचा संशय तपासात बळावला.
इतकेच नव्हे, तर हत्येसाठी वापरण्यात आलेली दोरी जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मीराबाई राठोड, हरसिंग राठोड आणि सचिन राठोड या तिघांना अटक करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वी आत्महत्या म्हणून समोर आलेल्या घटनेमागेच कुटुंबातील तिघांनी मिळून खून केल्याचा आरोप समोर आल्याने मोहाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
![]()






