जळगाव समाचार | १५ जुलै २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असतानाही चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेच्या २३ शाळांमध्ये १३९ शिक्षक कार्यरत असताना आतापर्यंत केवळ ७० नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, विशेषतः इयत्ता पहिलीच्या प्रवेशसंख्येत झालेली घट शिक्षण विभागासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
महानगरपालिकेच्या अखत्यारीत सध्या १२ मराठी, १० उर्दू आणि एक हिंदी माध्यमाची शाळा कार्यरत आहेत. मागील शैक्षणिक वर्षात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ८२१, तर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये तीन हजार ७९५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र यंदा नव्या प्रवेशांची गती मंदावल्याने एकूण विद्यार्थीसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी मोफत गणवेश, बूट, दप्तर, पोषण आहार यांसह विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. तरीही अपेक्षित प्रमाणात प्रवेश होत नसल्याने शिक्षण विभागाने प्रवेश अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी शिक्षकांची बैठक घेऊन प्रवेश अभियान अधिक परिणामकारकपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. परिसरनिहाय प्रवेश शिबिरे, पालक-शिक्षक संवाद मेळावे, जनजागृती मोहीम तसेच विद्यार्थी व पालकांना आकर्षित करणारे विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा सुरू करण्यात आली असून बालवाड्यांमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. या नव्या सुविधांमुळे आगामी काळात प्रवेशसंख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

![]()





