खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरी प्रकरणाचा उलगडा; तिघांना अटक सोन्या-चांदीचे दागिने व रोकड जप्त, मात्र ‘सीडी’ आणि कागदपत्रांचे गूढ कायम

जळगाव समाचार | ३ नोव्हेंबर २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी उल्हासनगर येथील तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड हस्तगत केली आहे.

मात्र, खडसे यांनी उल्लेख केलेल्या ‘महत्त्वाच्या सीडी व कागदपत्रांबाबत’ अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यांत तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील इतर तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी चोरी करण्यापूर्वी काही दिवस मुक्ताई बंगल्याची रेकी केल्याचेही उघड झाले आहे.

चोरीच्या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी घरातून दागिन्यांसोबतच महत्त्वाची कागदपत्रे आणि काही सीडी चोरीला गेल्याचा दावा केला होता.

तथापि, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “खडसे यांनी पोलिसांत केवळ दागिन्यांच्या चोरीचीच फिर्याद दिली होती आणि त्यानुसारच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कागदपत्रे अथवा सीडी चोरीला गेल्याची बाब तपासात सिद्ध झालेली नाही, मात्र त्या दिशेने तपास सुरू आहे.”

पोलिसांनी दागिन्यांच्या चोरीचा उलगडा केला असला तरी, कथित ‘सीडी’ आणि कागदपत्रांचे गूढ मात्र अजून कायम आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here